पौड : मुळशी तहसिलदार कार्यालयासाठी आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नातून १५ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असून तालुक्यातील विविध रस्त्यासाठी १५ कोटी रूपये असा एकूण ३० कोटी रूपयांचा निधी मुळशी तालुक्यासाठी मिळाला असल्याची माहिती मुळशी तालुका काँग्रेस अध्यक्ष गंगाराम मातेरे यांनी दिली आहे.
पौड येथे असलेल्या मुळशी तहसिलदार कार्यालयाची इमारत पुरातन असून जीर्ण झालेली आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी निधी मिळावा असा प्रयत्न तालुक्यातील सर्व राजकीय पक्षानी केला. आमदार संग्राम थोपटे यांनी अनेक वेळा यासाठी प्रयत्न सुध्दा केले होते. पौड येथे तहसिलदार कार्यालयाच्या इमारतीसाठी अखेर १५ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.
यामध्ये पौड - दारवली -भरे - लवळे रस्ता व पूल २.५० कोटी, संभवे- शेडाणी- पोमगांव - घुसळखांब रस्ता ८ कोटी रूपये रूदीकरणासह, मुठा नदीवर लहान पूल बांधणे २.५ कोटी रूपये, वळकी नदीवरील कुमकुवत मोठ्या पूलाची पुर्नबांधणी करणे १ कोटी रूपये एवढा निधी उपलब्ध झाला असून या सर्व कामांना प्रशासकीय मान्यता देखील मिळाली असल्याची माहिती गंगाराम मातेरे यांनी दिली आहे.