पौड येथे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमित कंधारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून नाना-नाणी पार्क साकारत आहे. याच माध्यमातुन छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवस्मारक व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी प्रत्येकी ५० लक्ष निधीची तरतूद करण्यात आली. त्यामुळे यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती तालुकास्तरावर स्थापन केली. तालुक्यातील राजकीय पक्षाचे नेते, कीर्तनकार, पत्रकार, इतिहास संशोधक, गडप्रेमी तसेच पौड गावाचे सरपंच यांना या समितीमध्ये समाविष्ट केले.
या समितीत छत्रपती शिवरायांच्या स्मारकाची दैनंदिन पूजा, साफसफाई, दिवाबत्ती करणाऱ्या धारकरी, शिवभक्तांना विश्वासात न घेतल्यामुळे हा वाद पेटला.
पौड गावातील युवक हे काहीही गवगवा न करता शिवकार्यात स्वतःला अखंड वाहून घेत असतात. शिवस्मारकाची नित्य पुजा, बलिदानमास, शिवजयंती, शिवप्रभु पालखी सोहळा, दुर्गसंवर्धन, गडकोट मोहिमा, दुर्गामाता दौड, आठवड्यातून तीन दिवस शिववंदना, शिवचरित्र पारायण, राजमाता जिजाऊ यांची जयंती, पुण्यतिथी, शंभुमहाराजांची जयंती पुण्यतिथी हे उत्सव एकत्रित येत उत्साहात साजरा करतात. परंतु स्थानिक या युवकांना विश्वासात न घेतल्याने त्यांनी विरोध दर्शवणारे पत्र तयार करुन उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार शंकर मांडेकर, जिल्हाधिकारी कार्यालय, धर्मदाय आयुक्त, पोलीस निरीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, यांच्या कार्यालयात दिले.
शिवजयंती कार्यक्रमास त्यांचा कसलाच विरोध नाही, मात्र समिती ही पौड गाव पातळीवरच असावी अशी ठाम भूमिका घेतल्याने स्थापन झालेली समिती संबंधितांना रद्द करावी.
मुळशीचे तहसीलदार रणजित भोसले व पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी सामोपचाराने हा वाद पोलीस स्टेशनमध्ये बसून मिटवला आहे. पौडमधील शिवप्रेमिंचे स्मारकासाठी कष्ट व तेथील कामकाजासंदर्भात मनापासून प्रयत्न असल्याने त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे कोणालाही दुखावून आपल्याला शिवकार्य करायचे नसल्याने ही समिती रद्द करत असल्याचे कंधारे यांनी तहसीलदार रणजित भोसले, पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी व पत्रकार यांच्यासमोर जाहीर केले.
पौड हे तालुक्याचे ठिकाण म्हणून मी तालुकास्तरीय शिवजयंती साजरी व्हावी म्हणून प्रयत्न केला व समिती स्थापन करून विविध कार्यक्रमांचे नियोजन केले होते. मात्र ही समिती रद्द करून पौड ग्रामस्थ व त्यांच्या भूमिकेचं स्वागत करून त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवतो. भविष्यात पौड ग्रामस्थ म्हणतील तसे नियोजन व समितीबद्दल निर्णय घेण्यात येईल.
आधी तयार केलेल्या समितीत छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक समिती असा उल्लेख होता परंतु आता यांत बदल करीत छत्रपती श्री शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजयंती उत्सव असा उल्लेख केलेला आहे. हि समिती पौड गावातील शिवस्मारकासाठी नसून मुळशी तालुका आयोजीत शिवजयंती साठी आहे.
सर्व मुळशीकरांनी उद्या १९ फेब्रुवारीच्या शिवजयंतीच्या मिरवणुकीस उपस्थित राहून शिवाव्याख्याते गणेशजी शिंदे यांच्या शिवाव्याख्यानाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.