logo
add image
add image
Blog single photo

कोण होणार भोरचा आमदार?





विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी पार पडलं. हा दिवस मोठ्या उत्साहाचा तसेच अनेक धामधुमीच्या घटनांनी भरलेला ठरला. भोर मतदार संघात एकुण 67.79 % मतदान झाल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं.

        अत्यंत स्पर्धात्मक वळणावर असलेल्या या मतदारसंघात सहा उमेदवार रिंगणात होते, परंतु शेवटी सैनिक समाज पार्टीचे उमेदवार अनिल जगताप यांनी नसरापुर येथे झालेल्या सभेत आमदार संग्राम थोपटे यांना जाहिर पाठींबा दिला. त्यामुळे हि लढत पंचरंगीच झाली. परंतु येथे झालेली लढत ही  महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशीच चर्चा आहे. 

         या मतदारसंघात महायुतीकडुन शंकर मांडेकर, महाविकास आघाडी कडून संग्राम थोपटे, शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे, भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार किरण दगडे व दलित शोषित बिछडा वर्ग अधिकार दलाचे लक्ष्मण कुंभार हे उमेदवार रिंगणात होते. 

         भोर विधानसभा मतदार संघात तिनही तालुक्यात झालेल्या मतदानात एकूण 430278 मतदार असून त्यापैकी 291704 इतक्या नागरिकांनी म्हणजेच 67.79% मतदारांनी मतदान केले. भोर तालुक्यात 170213 इतके मतदार असून त्यापैकी 125176 इतक्या नागरीकांनी म्हणजेच 73.54% मतदारांनी मतदान केले. राजगड तालुक्यात 54050 इतके मतदार असून त्यापैकी 39921 इतक्या नागरीकांनी म्हणजेच 73.86% मतदारांनी मतदान केले. तर मुळशी तालुक्यात 206015 इतके मतदार असून त्यापैकी फक्त 126607 इतक्या नागरीकांनी म्हणजेच 61.46% मतदारांनी मतदान केले. झालेल्या मतदानापैकी भोर आणि मुळशी तालुक्यातील मतदान केलेल्या नागरिकांचा आकडा हा जवळपास समसमान आहे.

          2019 च्या झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी शिवसेनेचे कुलदिप कोंडे यांना केवळ 9206 मतांनी मागे टाकत निवडुन आले. यावेळी भोर मतदार संघात 361734 मतदार होते. आता हि संख्या वाढुन तब्बल 430278 इतकी झाली आहे. मुळशी तालुक्यात शहरीकरणही मोठ्या जोमाने वाढत असल्याने मतदारांची संख्याही अफाट वाढली आहे. यासाठी तालुक्यातील मोठमोठया सोसायट्यांतही सहा नविन मतदानकेंद्रे नव्याने  उभी करण्यात आली. 

         मुळशी तालुक्यातील मतदारांची संख्या ही भोर आणि राजगडपेक्षा जास्त असल्यामुळे निवडणुकीपूर्वी भोरचा आमदार हा मुळशीच ठरवणार अशी चर्चा होती. परंतु मुळशीत फक्त 61.46% मतदान झाले. हा आकडा भोर व राजगडमध्ये 73% च्या आसपास आहे. मुळशी तालुक्यातुन त्यामानाने खूपच कमी मतदान झाले, त्यामुळे भोरचा आमदार हा मुळशी ठरवणार हे साफ चुकीचे ठरले असल्याचे बोलले जाते.

उमेदवारांबद्दल काय म्हणतात मतदार?

  • शंकर मांडेकरांबद्दल थोडेसे- 

मुळशी तालुक्यात सोशल मिडीयावर आमदार मुळशीचाच हवा अशा चर्चा रंगलेल्या पहायला मिळाल्या. महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांना गावागावांतुन पाठींबा, कुस्तीगीरांकडून पाठिंबा, धनगर समाजाच्या वतीने पाठिंबा, बैलगाडा शौकिनांकडुन पाठिंबा, क्रिकेट असोसिएशन कडून पाठिंबा, सकल हिंदू समाजाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला होता. त्यांना माननारा तरुणवर्गही मोठा आहे. वेळेला धावुन येणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. मांडेकर यांच्या प्रचारासाठी भोर आणि मुळशी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, तसेच हिंजवडी येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सभाही घेतली होती. 

  • संग्राम थोपटेंबद्दल थोडेसे-

संग्राम थोपटे यांनी मागील पंधरा वर्षात झालेल्या विकास कामांवर ही निवडणूक लढवल्याचे बोलले जाते. या मतदारसंघात मागील पाच वर्षात 1829 कोटी रुपयांचा निधी त्यांनी खर्च केला आहे. या विकास कामामुळे भोर मतदार संघ सुजलम सुफलम झाल्याचे संग्राम थोपटे यांनी सांगितले. पक्षाशी ते एकनिष्ठ राहिले. थोपटे यांच्यासाठी महाविकास आघाडीचे नेते, माजी केंद्रीय मंत्री तथा पद्मभूषण खासदार शरद पवार तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांची सभा आयोजित केली होती. 

  • किरण दगडेंबद्दल थोडेसे-

भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार नगरसेवक किरण दगडे यांनी मतदारसंघातील नागरीकांना काशीयात्रा घडवुन आणली. महिलांसाठी कोल्हापूर व बाळूमामा यात्रा घडवून आणली त्याचबरोबर कुटुंबांना दिवाळी संरंजाम किराणा वाटपही केला. त्यामुळे त्यांचा घरोघरी प्रचार झाला. आधुनिक श्रावणबाळ, वेळेला धावून येणारा नेता अशी त्यांची तालुक्यात ओळख निर्माण झाली. त्यामुळे त्यांना मानणारा मोठा मतदार वर्ग तयार झाला. नेत्यांच्या प्रचारासाठी मोठमोठे नेते प्रचारसभा घेण्यासाठी आले परंतु किरण दगडे यांच्या प्रचारसभेत सामान्य नागरिकांनी सभा गाजवली. 

  • कुलदिप कोंडेंबद्दल थोडेसे- 

शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार कुलदीप कुंडे यांनी भोर मतदार संघात आरोग्य, शिक्षण, वीज, रस्ते, पाणी, रोजगार निर्मिती अशा पायाभूत सुविधांवर निवडणूक लढवली. भोर राजगड व मुळशी या तीनही तालुक्यात त्यांनी प्रचारदौरे करत कोपरा सभा घेतल्या. अनेक भागात टू-व्हीलर व रिक्षा रॅली काढल्या. त्यांना माननारा पैलवानवर्गही मोठ्या प्रमाणात आहे. मागील निवडणुकीत ते फक्त 9206 मतांनी पिछाडीवर होते. 

         भोर मतदार संघात या चारही उमेदवारांनी आपली बाजु कशी चांगली हे मांडले. दुस-या प्रतिस्पर्धी उमेदवारांवर टिका-टिपण्या केल्या. मागास राहिलेला भोर मतदार संघ, पायाभूत सुविधांचा अभाव, एमआयडीसी, पर्यटण क्षेत्राचा रखडलेला विकास, असे अनेक नागरीकांचे प्रश्न मांडुन मी हे सोडवणार असल्याचे आश्वासनही दिले. येत्या शनिवारी (दि. २३ नोव्हें) रोजी भोर येथे मतमोजणी होणार असुन कोणता उमेदवार आपले नशिब आजमावत नागरीकांना दिलेले आश्वासन पुर्ण करणार? याकडे भोर-राजगड-मुळशी या तिनही तालुक्यातील नागरीकांचे लक्ष लागले आहे. 


add image
add image

Leave Comments

Top