पिरंगुट : मुळशी तालुक्यात बंद झालेल्या पीएमपीएमएलच्या बससेवा पुन्हा सुरू कराव्यात अशी मागणी मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे यांनी केली आहे.
मुळशी तालुक्यात खारावडे, लवार्डे,बेलावडे आणि काशिग येथे पीएमपीएमएलची बससेवा एक वर्षापासून सुरू होती.व सर्व मार्गावर हि बससेवा फायद्यात सुरू होती.परंतु गेल्या आठ दिवसांपासून ती अचानक बंद केली आहे. बससेवा अचानक बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी, कामगार,नागरिक व प्रवासाचे हाल होत आहेत. प्रवाशांना तासन् तास बस स्थानकावर ताटकळात थांबावे लागत आहे. खारावडे येथील म्हसोबा देवस्थानला येणाऱ्या हजारो भाविकांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे.मुळशीत बंद झालेल्या पीएमपीएमएलच्या बस पुन्हा सुरू करण्यात याव्यात. बस सेवा दोन दिवसांत सुरू न झाल्यास रास्ता रोको आंदोलनाच इशारा मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे यांनी दिला आहे.
यावेळी म्हसोबा देवस्थानच्या अध्यक्षा मधुरा भेलके, सरपंच लक्ष्मण मारणे, उपाध्यक्ष दिनेश जोगावडे, आंदगावचे सरपंच प्रफुल्ल मारणे, विश्वस्त संभाजी गावडे, माऊली ढेबे, सागर शेजवळ, नाना मारणे, गुलाब मारणे, संजय गावडे आदींसह विद्यार्थी,महिला व कामगार वर्ग यावेळी उपस्थित होता.