पौड : मुळशी तालुक्यातील बचत गटाच्या महिलांनी तयार केलेला चांगल्या दर्जाचा व भेसळमुक्त दिवाळी फराळ पौड येथील पंचायत समितीच्या आवारात नागरिकांना खरेदी करण्यासाठी उपलब्ध होणार आहे.
मुळशी तालुक्यातील काही बचत गट भेसळमुक्त व चविष्ट दिवाळी फराळ बनवतात. माञ तो खपण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध होत नाही. यासाठी मुळशी गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी पुढाकार घेऊन पौड येथील पंचायत समितीच्या आवारात बचत गटातील महिलांना दोन स्टाँल उपलब्ध करून दिले आहे.हे स्टाँल गुरूवार ( दि.२० ) ते बुधवार ( दि.२६ ) पर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यत सुरू राहणार आहेत.
अनेक ठिकाणी डालडा वापरून किंवा खराब तेल वापरून फराळ बनविला जातो. माञ बचत गटाच्या माध्यमातून नागरिकांना स्वस्त दरात भेसळमुक्त, खाञीशीर व चांगल्या दर्जाचे दिवाळी फराळाचे पदार्थ उपलब्ध होणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी दिली आहे.