पौड : मुळशी तालुक्यातील भुकुम येथे प्रथम लंपी ग्रस्त बैल आढळल्यानंतर कुळे, वाळेन, मारुंजी व मुलखेड या ठिकाणी जनावरांमध्ये लंपी आजाराची लक्षणे आढळून आली. सदर भागात खाजगी पशुवैद्यकांच्या सहकार्याने एकूण १०००० जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. तालुक्यातील एकूण २२००० गो वर्गीय पशुधन आहे. शासनाने दि. २० सप्टेंबर रोजी बाधित क्षेत्र बाहेर देखील गाय व बैल वर्ग यास लंपी प्रतिबंधक लसीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार उर्वरित १२००० गाय वर्गीय पशुधनासल लंपी प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी मुळशी तालुक्यातील शासकीय अधिकारी /कर्मचारी ,सेवानिवृत्त पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक तसेच खाजगी पशुधन पर्यवेक्षक यांचे सहकार्याने २६ जणांची टीम तयार करण्यात आली आहे. दि.२३ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या तीन दिवसात मुळशी तालुक्यात लंपी प्रतिबंधक महालसीकरण मोहीम पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणार आहे . लंपी चर्मरोग सनियंत्रन समितीचे अध्यक्ष तहसीलदार अभय चव्हाण तसेच समितीचे सदस्य गटविकास अधिकारी संदीप जठार व सदस्य सचिव पशुधन विकास अधिकारी (विस्तार ) डॉ.सचिन काळे यांनी हे नियोजन केल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार तालुक्यातील सर्व पशुपालकांनी लसीकरणास येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना योग्य ते सहकार्य करावे. आपले पशुधन लसीकरणासाठी उपलब्ध करून द्यावेत व लसीकरण करून घ्यावे असे आवाहन तालुकास्तरीय सनियंत्रण समितीने केले आहे.