भूगाव : भुगांवचे गावचे माजी आदर्श उपसरपंच अक्षय सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्ताने संघर्ष स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने उद्या (दि २०)जोर स्पर्धेचे भूगावमध्ये आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दहा वर्षाखालील पंधरा वर्षाखालील आणि पंधरा वर्षावरील अशा विविध वजन गटांमधील स्पर्धकांना भाग घेता येणार आहे. तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात तालुक्यातील विविध तालमीमधील अनेक मुलांनी सहभाग नोंदवला असून याची चर्चा संपूर्ण तालुक्यामध्ये होत आहे. या स्पर्धेमध्ये विजेत्यांना रोख रक्कम तसेच पौष्टिक खुराक देण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास एक आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.
येथील शंभू महादेव मंदिरामध्ये ही स्पर्धा भरणार असून आयोजकांच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे. मुळशी तालुका हा कुस्ती पंढरी म्हणून ओळखला जातो याच कुस्ती पंढरीला पुन्हा सोन्याचे दिवस आणण्यासाठी पैलवानांचा उत्साह वाढविण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे अक्षय सातपुते यांनी सांगितले. या स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील अनेक नामांकित वस्ताद स्पर्धेचे परीक्षक म्हणून राहणार आहेत. तसेच यावेळी माजी उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील जुन्या जाणत्या पहिलवान आणि वस्ताद मंडळींचा सत्कारही करण्यात येणार आहे. पूर्वी गावागावात सकाळी आणि संध्याकाळी तालमीमध्ये हुप्पा हुय्या....जय बजरंगा..... असा आवाज घुमायचा परंतु आजकाल या जिमच्या जमान्यामध्ये जुन्या तालमीतील व्यायामांना पुन्हा सोन्याचे दिवस आणण्याची गरज आहे म्हणून या स्पर्धेचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आल्याचे संयोजन कमिटीच्या वतीने सांगण्यात आले.