पौड : हजारो वर्षांपूर्वी प्रभू श्रीरामांनी अपप्रवृत्तीचा नाश करून रामराज्य निर्माण केले.तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून छत्रपती शिवरायांनी संपूर्ण हिंदुस्थानात रामराज्य निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले. पुढे छत्रपती संभाजी राजापासून वेगवेगळ्या पराक्रमी वीरांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीचे तख्त राखले गेले . राष्ट्राप्रति त्यागाची भावना असलेल्या या विरामुळे स्वराज्य निर्माण करता आले. म्हणून केवळ स्वप्न न पाहता ते कृतीत उतरविण्यासाठी कृती करण्याची गरज असते. असे प्रतिपादन डॉ.संदीप महिंद यांनी केले. ते तिकोणा गड येथील राम नवमी महोत्सवाच्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
श्री शिवदुर्ग संवर्धनासाठी गेली अनेक वर्षे कार्यरत असलेल्या श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेच्या वतीने श्री रामनवमीच्या निमित्ताने तिकोणा गडावर महाश्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत मुळशी तालुक्यातील शेकडो तरुणांसह पुणे जिल्ह्यातून अनेक दूर्गप्रेमी सहभागी झाले होते.
सकाळी गडावर श्रमदान करण्यात आले. यावेळी इतिहासाचे अभ्यासक डॉ.संदीप महिंद यांचे शिवचरित्रपर व्याख्यान , श्रीरामाचे पूजन ,महाआरती व महाप्रसाद असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. श्रमदान मोहिमेत श्री.शिवदुर्ग संवर्धन,पिंपरी, मुळशी व पुणे, शिवसमर्थ बचत गट,,गडझुंजार , शिवस्वराज्य प्रतिष्ठान मुंबई,शिवभारत परिवार, तिकोणा पेठ ग्रामस्थ,यांच्यासह विविध संस्था ,संघटना ही सहभागी झाल्या होत्या.
याप्रसंगी राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्थेचे सचिव अनिल व्यास, चिंतामणी चितळे, शिवसंमर्थ बचत गटाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पवळे,शिवदुर्गचे राजेंद्र नेलगे,संतोष गोलांडे, तिकोणा पेठचे माजी सरपंच काशीनाथ मोहोळ, पोलीस पाटील अनंता खैरे ,उद्योजक आबासाहेब शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.