पिरंगूट : पिरंगूट गावचे माजी सरपंच आणि मुळशी तालुका शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस मोहन गोळे आणि पिरंगूट विविध कार्यकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन राजूशेठ पवळे यांनी महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि भोर वेल्हा मुळशीचे आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून या प्रवेशाने मुळशी तालुक्यात काँग्रेस पक्ष आणखीनच बळकट झाला आहे.
यामध्ये तालुका अध्यक्ष अजय देवराम पवळे, सचिव जावेद रज्जाक पठान, सौरभ विजय गोळे,यांनीही राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून काँग्रेस पक्षात स्वागत करण्यात आले.
यावेळी मुळशी तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे,मुळशी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दादाराम माडेंकर, पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुहास भोते,महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस कुमार शेडगे, गणेश पवळे आदी उपस्थित होते.
आमदार संग्राम थोपटे यांच्यामुळे मुळशी तालुक्यात कोट्यावधी रूपयांचा विकास निधी येत असून सर्वसामान्य जनतेची कामे होऊ लागली आहेत.यामुळे अनेक जण काँग्रेस पक्षात प्रवेश करत असून पुढील काळातही अनेक जण काँग्रेस प्रवेश करणार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे यांनी दिली.
नुकताचा काँग्रेस प्रवेश केलेले मोहन गोळे यावेळी बोलताना म्हणाले की, आमदार संग्राम थोपटे यांची कार्यपध्दत वेगळी असून मतदार संघ मोठा असतानाही तीनही तालुक्यात त्यांनी विकास गंगा आणली आहे. यापुढील काळात त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहून काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्यावर लक्ष देणार आहे.