पिरंगूट : शिवाजी महाराजां प्रमाणेच गुरु व आईवडिलांच्या आज्ञेचे पालन करणारेच थोर इतिहास घडवू शकतात “ असा संदेश देऊन घरोघरी शिवाजी जन्माला नाही आला तरी शिवाजी महाराजांचे गुण अंगी बाळगून कार्य केले पाहिजे असे मोलाचे मार्गदर्शन पेरिविंकल स्कूलचे संस्थापक - अध्यक्ष राजेंद्र बांदल यांनी व्यक्त केले..
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या सुस शाखेत शिवजयंती सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. शिव जन्मोत्सव म्हणजे प्रत्येक मूला मुलांच्या मनामध्ये असलेला हा अप्रतिम सोहळा पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल सुस येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचा प्रारंभ वक्ते पंकज महाराज गावडे ,जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर , प्रसिद्ध गायिका प्रांजली बर्वे तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल,शिवानी बांदल, शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मल पंडित व पर्यवेक्षिका शुभा कुलकर्णी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करुन झाली . शिवाजी महाराजांची जीवनयात्रा ही विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमद्वारे पाळणागीता पासून ते शिवराज्याभिषेक सोहळा व शपथविधी पर्यंत अत्यंत कल्पकतेने सादर केली.शिवजन्म सोहळा पाळणा गीत गाऊन साजरा झाला. त्यानंतर बालशिवाजी व मोठे शिवाजी खऱ्या घोड्यावर स्वार होऊन आले व नंतर शिव राज्याभिषेक सोहळा हा कार्यक्रमात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची स्फूर्ती वाढवण्यासाठी इयत्ता ५ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यानी शिवआराधना व,देवीचा गोंधळ, जेजुरी गढ असे अंगावर शहारे आणणारे एक पेक्षा एक परफॉर्मन्स दिले.
पंकज महाराज गावडे यांनी शिवाजीमहाराजांची कीर्ती व त्यामागचा इतिहास अत्यंत सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना सांगून सर्व विद्यार्थ्याचे कौतुक केले.तसेच या जगात कुठेही गेलो तरी शिवाजी महाराज कायम स्मरणात ठेऊन त्यांच्या सारखे युक्तीने कसं लढता येईल हे शिकणारा विद्यार्थी म्हणजे आजच्या काळातला शिवाजी असे डायरेक्टर शिवानी बांदल यांनी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधताना सांगितले .प्रसिद्ध गायिका प्रांजली बर्वे यांनी न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम आज येथे बघायला मिळाला असे सांगून शिवाजी महाराजांवरील गाणे गायली .
इंग्रजी ही काळाची गरज असली तरी महाराष्ट्राची संस्कृती जपली गेलीच पाहिजे व हे फक्त पेरिविंकल मधेच बघायला मिळते असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र बांदल व संचालिका रेखा बांदल यांच्या अध्यक्षतेखाली सुस शाखेच्या मुख्याध्यापिका निर्मल पंडित यांच्या मार्गदर्शनाने पर्यवेक्षिका शुभा कुलकर्णी, शिक्षक सागर शिंदे , योगीता धाने यांच्या सहकार्याने सर्व सहकारी शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मदतीने शिवजयंतीचा हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षरा केकरे यांनी केले.