भुगांव : मुळशी तालुक्यात गेली जवळपास २१ वर्षे समाजकारणात, राजकारणात सक्रिय असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी युवक तालुका कार्याध्यक्ष अनिल निवृत्ती पवार यांच्या कार्य अहवालाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब यांच्या हस्ते आज दिल्ली येथे प्रकाशन झाले.
मुळशी तालुक्यातील भूगावचे अनिल पवार गेली जवळपास २१ वर्षे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून पक्षाशी एकनिष्ठ आहेत. शैक्षणिक, पर्यावरण, सहकार, नदी संवर्धन, साहित्य, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आध्यात्मिक - धार्मिक अशा अनेक क्षेत्रांत अनिल पवार यांनी केलेल्या विधायक विकासकामांचा आलेख नेहमीच चढता आहे. मुळशी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष पदावर त्यांनी यापूर्वी काम केले असून आज ते राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ताम्हणून काम करत असतात तर विविध सामाजिक संस्थांवर पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
आजपर्यंत त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक मार्गदर्शन, प्रेरणादायी व्याख्याने, करियर मार्गदर्शन व्याख्यानमाला; विविध आरोग्य शिबिरे यांचे आयोजन सातत्याने केले आहे. आजवर त्यांनी तालुक्यातील २५,००० नागरिकांना आधार कार्ड मिळवून देण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. याशिवाय त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून राबवलेल्या रामनदी स्वच्छता अभियानामुळे स्थानिक लोकांच्या सहभागातून नदीच्या रक्षणाची, संवर्धनाची अनोखी मोहीम आकार घेत आहे. आपल्या स्वच्छ चारित्र्यामुळे आणि दांडग्या जन संपर्कामुळे तालुक्यातील नेते मंडळीपासून ते सर्वसामान्य लोकांपर्यंत त्यांनी चांगले संबंध प्रस्थापित केले आहेत. त्यांच्या आजवरच्या कार्याचा दीर्घ अहवाल त्यांनी पवार साहेबांना सुपूर्द केला असून, साहेबांनी त्यांच्या कार्याचे आणि धडाडीचे मनापासून कौतुक केले.यावेळी राष्ट्रवादी युवक कॅांग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे उपस्थित होते.