logo
add image
add image
Blog single photo

रामनदी स्वच्छता मोहिमेस खासदार सुप्रिया सुळे यांची भेट


पिरंगूट : सह्याद्री प्रतिष्ठान, ग्रामपंचायत भूगाव आणि ग्रामपंचायत भुकूम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रामनदीवरील  छत्रपती शिवाजी महाराज जलाशय येथील स्वच्छता मोहिमेस संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. 

         २ ऑक्टोबर या गांधी जयंतीचे निमित्त साधून २६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर हा आठवडा स्वच्छता सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत असून सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल निवृत्ती पवार यांच्या अभिनव संकलपनेतून ही मोहीम गेली ७ वर्षे सुरू आहे. अनिल पवार यांनी रामनदीचे वाढते प्रदूषण, तिथे माजत असलेले तणाचे साम्राज्य आणि वाढत्या बेकायदेशीर बांधकामामुळे तसेच मल व्यवस्थापनातील ढिसाळ कारभार व उद्योगधंद्यांच्या सांडपाणीचे गैरव्यवस्थापन यांकडे गेली सात वर्षे सर्वांचे लक्ष वेधले. 

         श्री छत्रपती शिवाजी महाराज तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचत गेल्याने तलावाची क्षमता कमी झाली असून, सामूहिक प्रयत्नांतून हा गाळ बाहेर काढण्याचे आणि त्या योगे तलावाची साठवण क्षमता वाढवण्याचे लक्षवेधी कार्य अनिल पवार यांचे सह्याद्री प्रतिष्ठान, भूगाव ग्रामपंचायत आणि भूकूम ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू आहे. या स्वच्छता मोहिमेस आज खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देऊन, कार्याची सविस्तर माहिती घेतली. शिवाय, या कामी प्रशासकीय स्तरावर काय सहकार्य करता येईल याचा आढावाही त्यांनी घेतला. या प्रसंगी थेट जागेवरून जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवर संवाद साधून या विषयात लक्ष देण्याची विनंती खासदार सुळे यांनी केली.           धरणाच्या हद्दीचे मोजमाप करून, हद्दी निश्चित करण्यात याव्यात अशी विनंतीही त्यांनी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना केली.

              या जलाशयाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज जलाशय असे अधिकृत नामकरण करण्यासाठी अनिल पवार यांनी ग्रामपंचायत भूगाव, पुणे जिल्हा परिषद यांच्याकडून ठराव करून घेतला आहे. याच बरोबर त्यांनी कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक व जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता यांचा सकारात्मक अहवाल महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाला पाठवून त्याचा सातत्याने पाठपुरावा केला आहे. सामान्य प्रशासन विभागाने सदरचा सकारात्मक प्रस्ताव चार वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन जलसंपदा मंत्री महोदय यांच्याकडे पाठवला आहे. पण लाल फितीच्या कारभारात हा प्रस्ताव रखडला आहे. तरी विद्यमान जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचेकडून तो मंजूर व्हावा असे लेखी विनंतीपत्र अनिल पवार यांच्याकडून खासदार सुप्रिया सुळे यांना देण्यात आले. 

         या प्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, शांताराम इंगवले, रविंद्र कंधारे, शंकर मांडेकर, बाळासाहेब सणस, माऊली कांबळे, भूगावच्या सरपंच निकीता सणस, भुकूमच्या सरपंच रेखा वाघ, उपसरपंच सचिन आंग्रे, सतीश इंगवले, विशाल भिलारे, अर्चना सुर्वे, सचिन हगवणे, निलेश ननावरे, विजय माझीरे, राहुल शेडगे, कालिदास शेडगे, प्रदीप चोंदे, विशाल सुर्वे, माऊली आंग्रे, प्रशांत इंगवले, नितीन शेडगे, संतोष सुर्वे, अमित मोरे आणि भूगाव भुकूमचे ग्राम पंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

add image
add image

Leave Comments

Top