पौड : पौड तहसिलदार कार्यालयाच्या परिसरात महिलांसाठी शौचालय उपलब्ध करून द्यावे अशी मागणी मुळशी तालुका शिवसेना महिला आघाडीच्या वतीने तहसीलदार अभय चव्हाण यांच्याकडे शिवसेना महिला आघाडीच्या तालुका संघटिका ज्योती चांदेरे यांनी निवेदनाव्दारे केली आहे.
पौड तहसिलदार कार्यालय परिसरात पोलिस स्टेशन,सहाय्यक निबंधक कार्यालय, भुमी अभिलेख कार्यालय, ग्रामीण रूग्णालय, पंचायत समिती तसेच इतर शासकीय कार्यालये आहेत. या ठिकाणी कामानिमित्त अनेक महिला दररोज येत असतात. सध्या महिलांसाठी असलेले शौचालयाला कुलूप असते. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता तसेच दुर्गंधी असते. गेल्या अनेक वर्षापासून मागणी करुन सुध्दा प्रशासनाने लक्ष न घातल्यामुळे महिलांची या परिसरात मोठी गैरसोय होत आहे. तरी पौड तहसिलदार कार्यालय परिसरात महिलांसाठी स्वच्छतागृह किंवा शौचालय उभारण्यात यावे अशी मागणी निवेदनाव्दारे ज्योती चांदेरे यांनी केली आहे.
यावेळी माजी उपसभापती भानुदास पानसरे ,शिव सहकार सेनेचे संपर्कप्रमुख बाळासाहेब भांडे, युवा सेनेचे पुणे जिल्हा अधिकारी अविनाश बलकवडे ,भारतीय विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हा संघटक राम गायकवाड, जिल्हा सचिव नितीन चांदेरे, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य नामदेव टेमघरे, मुळशी तालुका संघटक दीपक करंजावणे ,संतोष शिंदे, उपतालुका प्रमुख सुरेश शिंदे, विभाग प्रमुख शिवाजी बलकवडे,उपतालुका सघंटक सुमन जोरी, रमेश पडवळ,मयुर रानवडे,कावेरी साठे, संतोषी मारणे, मदां राऊत,सरपंच नरेश भरम आदी पदाधिकारी उपस्थित होते.