पिरंगुट : भावी पिढीला योग्य दिशा देणारा शिक्षक हा समाजाचा महत्वाचा घटक आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांच्या कामाची दखल घेऊन शिक्षक दिनानिमित्त त्यांचा गौरव करून कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे असे मत कृपा उद्योग समूहाचे अध्यक्ष आबासाहेब शेळके यांनी व्यक्त केले.
आबासाहेब शेळके मित्र मंडळाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त गुणवंत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी आबासाहेब शेळके बोलत होते. या वेळी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण न यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून पौड येथील झील शाळेचे संस्थापक अध्यक्ष विक्रांत वाल्हेकर यांनी शिक्षकांचे समाजात असणारे स्थान आजही किती महत्वपूर्ण आहे यावर आपले मत मांडले.
यावेळी शाल, श्रीफळ, मानपत्र देऊन राजेंद्र नाईकरे, संतोष गावडे, महेश मोहोळ, गणेश केदारी, प्रदीप पाटील, योगेश गोसावी, प्रविण सातव ,सागर कुंभार व योगेश कोळवणकर या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सोमनाथ शिंदे, संदीप पवार, विलास चोंधे, माजी सैनिक सुरेश गोसावी तसेच सर्व शिक्षकांचे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिरंगुटचे माजी सरपंच रामदास पवळे, यांनी तर आभार कार्याध्यक्ष शाकीर शेख यांनी मानले.