पौड : मुळशी तालुक्याचे अभ्यासू नेतृत्व,शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख,माजी पंचायत समिती सदस्य,साप्ताहिक मुळशी दिनांकचे संपादक दत्ताभाऊ सुर्वे यांचे दुःखद निधन झाले आहे.
मुळशी तालुक्यात काँग्रेसची ग्रामपंचायत ते खासदारकी पर्यत सत्ता असताना शिवसेनेच्या माध्यमातून माजी आमदार शरद ढमाले,माजी जिल्हा प्रमुख काकासाहेब धावडे, एस.टी महामंडळाचे माजी संचालक राजाभाऊ रायकर,माजी जिल्हाप्रमुख नानासाहेब बलकवडे,माजी सभापती अशोक कुडले, नानासाहेब शिंदे, नामदेव भिलारे, सुदाम भुंडे,नामदेव टेमघरे,विष्णूपंत वाल्हेकर, मारूती तोंडे यांच्यासह दत्ताभाऊ सुर्वे यांनी काम चालू केले. कालची पोर काय करणार या भ्रमात असलेल्या काँग्रेस पक्षाच्या आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात काम करत दत्ताभाऊनी माजी आमदार शरद ढमाले यांच्या खांद्याला खांदा लावून अभ्यासपूर्ण पणे तालुक्यात शिवसेनेची घोडेदौड सुरू झाली.
शिवसेनेचा झंझावात आणि मुळशी तालुक्यात या महारथीची सुरू असलेले कामामुळे अनेक जण शिवसेनेसमवेत जोडले गेले. दत्ताभाऊचे अभ्यासपूर्ण असलेल्या कामामुळे माजी आमदार शरद ढमाले यांच्या रूपाने आंबवणे पंचायत समिती गणातून शिवसेनेनी विजय मिळवत शिवसेनेचा पहिला पंचायत समिती सदस्य निवडून आणला. त्यानंतर झालेल्या पंचायत समिती निवडणूकीत सहापैकी चार सदस्य शिवसेनेचे निवडून आणले व शिवसेनेचा पहिला सभापती मुळशी तालुक्याला मिळाला होता.
मुळशीत शिवसेनेचा सुरू असलेला झंझावात २००४ साली शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना फायदेशीर ठरला. राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन खासदार अशोक आण्णा मोहोळ यांना घरचा म्हणजे मुळशी तालुक्यातच मतदान होण्यापासून या सर्व महारथीनी रोखले.तर याच वर्षी झालेल्या मुळशी - हवेली विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे शरद ढमाले प्रचंड बहूमताने निवडून आले. यासर्व निवडणूकामध्ये दत्ताभाऊ सुर्वे यांचे अभ्यासपूर्ण राजकारण महत्वाचे ठरले.२००७ साली झालेल्या पंचायत समिती निवडणूकीत दत्ताभाऊ स्वतः पंचायत समितीला निवडून आले. २००७ सालीही मुळशीचा सभापती शिवसेनेचाच झाला होता.माञ सभापती होण्याचे दत्ताभाऊचे स्वप्न अपुरे राहिले.२०१२ साली आंबवणे पंचायत समिती निवडणूकीत दत्ताभाऊ सुर्वे यांचा पराभव झाला होता.
पंचायत समितीत काम करत असताना अभ्यासपूर्ण पणामुळे दत्ताभाऊनी येथील कर्मचाऱ्यांना जेरीस आणले होते.दत्ताभाऊ सुर्वे यांनी गेली २५ वर्ष कोणत्याही फायद्याचा विचार न करता साप्ताहिक मुळशी दिनांकच्या माध्यमातून तालुक्याच्या समस्या मांडल्या.खासदार,आमदार यांच्या निधीतून मुळशी तालुक्यात विकासाचा डोंगर उभा केला. माजी आमदार शरद ढमाले आणि दत्ताभाऊ सुर्वे म्हणजे मुळशी तालुक्यात कृष्ण - सुदाम्याची जोडी म्हणून प्रसिद्ध होती. २००४ साली शिवसेनेच्या आणि जोडगोळीच्या झंझावातापुढे मोठ्या मोठ्यांना नांगी टाकायला लागली.
गेली दोन दिवस दवाखान्यात असताना सत्यवान उभे, शरद ढमाले,राजेंद्र बांदल,विजयराव ढमाले,अनंतराव ढमाले,राम गायकवाड,स्वाती ढमाले, मारूती कुरपे,ज्ञानेश्वर डफळ, दिपक आबा करंजावणे, गणपत वाशिवले,दत्ता जाधव, बाळासाहेब जाधव,बाळासाहेब कुरपे,नाना मरगळे,पञकार विनोद माझिरे, पप्पू कंधारे, विजय दळवी, हनुमंत सुर्वे, दत्ता मेंगडे,विनायक ठोंबरे, भानुदास पानसरे यांच्या डोळ्यात पाणी तरळताना दिसत होते.