चिखलगावात यंत्राच्या सहाय्याने भात लावणी
पौड: स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त कृषी विभागाच्या वतीने चिखलगाव (ता. मुळशी) येथे कृषी मेळाव्याचे आयेजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणुन शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विवीध योजनांबद्दल देण्यात आली.
या कार्यक्रमाचे नियोजन वसुंधरा शेतकरी गट चिखलगाव यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी उपसभापती विजय केदारी, तालुका कृषी अधिकारी कुंडल हसरमनी, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक पोपट दुडे, प्रगतशील शेतकरी ज्ञानोबा राक्षे, चिखलगावचे सरपंच लहू मारुती फाले पौड येथील मंडल कृषी अधिकारी अर्जुन जाधव, कृषी विभागाचे विस्तार अधिकारी दत्तात्रय भालेराव, कृषी पर्यवेक्षक राजेंद्र होले, कृषी पर्यवेक्षक बाळासाहेब कळमकर, कृषी सहाय्यक शेखर वीरणक, शिवकुमार पाटील, स्वप्नाली रायते, पल्लवी पावसे, श्रुती शिंदे, गणेश तांदळे, वृषाली जाधव, चिखलगावचे पोलीस पाटील कृष्णा नामदेव फाले, केंद्रप्रमुख मधुकर येनपुरे, हरिभाऊ धिडे, जालिंदर ढमाले आदी उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक अर्जुन जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार विकास भोर यांनी मानले.
या मोहिमेअंतर्गत बियाणे निवड, बीज प्रक्रिया, खतांचा संतुलित वापर, चारसूत्री लागवड, मशिनद्वारे लागवड, किड व रोग नियंत्रण, उपायोजना, जमीन आरोग्य पत्रिका शिफारशीनुसार संतुलित माहिती देण्यात आली. तसेच विकेल ते पिकेल, महा डीबिटी, कृषि यांत्रिकीकरण, कृषक ॲप, फळबाग लागवड, पिक विमा, शेतकरी अपघात विमा आणि इतर योजनांबाबत माहिती देण्यात आली.
कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत मौजे चिखलगाव, नांदगाव, होतले या गावांमध्ये 25 एकर क्षेत्रावर मशिनद्वारे भात लागवड प्रकल्प घेण्यात आला आहे. त्यासाठी 'को 51' जातीचे भात बियाणे व लागणाऱ्या निविष्ठा कृषी विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आले आहे. 'को 51' ह्या जातीचे भात 105 ते 115 दिवसांत तयार होणार असून प्रति हेक्टरी उत्पादन 55 ते 60 क्विंटल मिळणार आहे. सदर प्रकल्पासाठी प्लॅस्टिक कागदावर मशीन साठी लागणाऱ्या साच्यामध्ये रोप वाटिका तयार करणे, बीज प्रक्रिया करणे ते लागवड करेपर्यंत तंत्रज्ञान याविषयी प्रत्यक्ष शेतावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
लहू फाले यांनी प्रथमच ब्ल्यू राईस ( निळा भात) ची आपल्या शेतात प्रायोगिक तत्त्वावर लागवड केली. निळा भात आरोग्यवर्धक, लोह, झिंक, कॅल्शियम खनिजे भरपूर प्रमाणात असून हे भात अँटीअॉक्सिडेंट आहे. मधुमेही व हृदयविकारावर गुणकारी तसेच कॅन्सर प्रतिरोधक असे अनेक गुणधर्म असल्याने ब्ल्यू राईस ला चांगली बाजारपेठ मिळण्याची शक्यता आहे असे तालुका कृषी अधिकारी श्री कुंडल हसरमनी यांनी सांगितले