पिरंगुट : पिरंगुट (ता. मुळशी) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी राहुल दामोदर पवळे यांची बिनविरोध निवड झाली. या आधीच्या उपसरपंच सारिका केदारी यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर राहुल पवळे यांची निवड झाली आहे.
मुळशी तालुक्याची औद्योगिक राजधानी अशी पिरंगुटची ओळख आहे. एकूण ग्रामपंचायत सदस्य संख्या सतरा आहे. आज उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. सरपंच चांगदेव पवळे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पद निवडीची सभा झाली. यामध्ये उपसरपंच पदासाठी राहुल पवळे यांचा एकमवे अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली. सभेचे सचिव म्हणून ग्रामविकास अधिकारी तुळशीराम रायकर यांनी काम पाहिले.
या वेळी सरपंच चांगदेव पवळे, मावळत्या उपसरपंच सारिका केदारी, ग्रामविकास अधिकारी तुळशीराम रायकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. निवडीनंतर ग्रामस्थांच्या वतीने उपसरपंच राहुल पवळे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सर्व ग्रामपंचायत सदस्यांना व ग्रामस्थांना विचारात घेऊन गाव कारभार करणार आहे. तसेच कचरा मुक्त गाव संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे उपसरपंच राहुल पवळे यांनी निवडीनंतर सांगितले.
नवनियुक्त उपसरपंच राहुल पवळे यांच्या मातोश्री ललिता पवळे यांनी पिरंगुट गावाच्या सरपंच पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. राहुल पवळे हे ही विविध संघटनाच्या माध्यमातून सदैव जनसेवेसाठी तत्पर आहेत. पिरंगुट व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले असून विद्यमान संचालक म्हणून कार्यरत आहेत. हनुमान तरुण मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष व झांज पथकाची प्रमुख जबाबदारी पार पाडत आहेत. हिंदवी प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते सामाजिक कार्यात अग्रेसर आहे.