logo
add image
add image
Blog single photo

कळमशेतमधील आदिवासी वस्तीवर चालणार स्मार्ट अभ्यासिका


पौड: लाॅकडाऊन काळात शाळा बंद आहेत. ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणासाठी अनंत अडचणी येत आहेत. त्यात आदिवासी वस्तीवरील पालकांकडे स्मार्ट फोन उपलब्ध नसल्याने तेथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अनेक समस्या येत आहेत. अशा वेळी मुलांच्या अभ्यासाच्या संकल्पना स्पष्ट होऊन त्यांना दिलेला अभ्यासक्रम समजावा व त्यांच्या ज्ञानात भर पडावी या सर्व गोष्टींचा विचार करून कळमशेत शाळेतील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री.संजीव बागुल यांनी 'स्मार्ट अभ्यासिका' हा उपक्रम कळमशेत येथील आदिवासी वस्तीवर सुरू केला आहे.

या अभ्यासिकेत चैतन्य साॅफ्टवेअर टेक्नॉलॉजीजने तयार केलेल्या अभ्यास संचाच्या सहाय्याने व रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल यांच्या आर्थिक मदतीने हा उपक्रम सुरू केला आहे. त्यासाठी अॅन्ड्राॅईड टीव्ही व अंगणवाडी ते इयत्ता दहावीपर्यंत पाठ्यक्रमयुक्त दृकश्राव्य साॅफ्टवेअर उपलब्ध केले आहे.या उपक्रमाद्वारे मुलांना शाळा बंदच्या काळात वस्तीवर जाऊन स्वयंसेवक व शिक्षकांमार्फत दररोज ही अभ्यासिका चालवली जात आहे. त्यासाठी स्वयंसेवकांचे  मानधन इन्स्टिटय़ूट फॉर वुमेन आंत्रप्रेनाॅरियल डेव्हलपमेंट या संस्थेमार्फत आणि श्री.बागुल व श्री.राठोड यांच्या वेतनातून दिले जात आहे.

असा हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारी कळमशेत ही तालुक्यातील पहिली शाळा ठरली आहे. आपल्या घराच्या जवळच ही अभ्यासिका सुरू केली असल्याने मुलांना अभ्यासाची गोडी निर्माण झाली आहे. शिवाय पालकांना आपली मुले वस्तीमध्येच सुरक्षितपणे शिकत असल्याचा आनंद मिळत आहे. गणित व इंग्रजीसारखे अवघड वाटणारे विषय या अभ्यासिकेमुळे मुलांना सोपे वाटत आहेत. 

कळमशेत येथील आदिवासी वस्तीवरील मुलांच्या शिक्षणासाठी  कोरोना काळात श्री.बागुल सर यांनी कंबर कसली असून मागील वर्षी सर्व मुलांना टॅब वाटप तसेच अभ्यास आपल्या दारी (अभ्यासाची वाडी) असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. वेगवेगळे विविधांगी उपक्रम राबविणारी कळमशेत ही शाळा तालुक्यात नेहमी अग्रेसर असून सर्व शिक्षकांना प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरली आहे. यामुळे कळमशेत शाळा व तेथील शिक्षकांचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे.


माझ्या आदिवासी बांधवांची मुले अशा संकटात शिक्षणात मागे राहू नयेत व त्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये व ती शिक्षणाच्या प्रवाहात टिकून रहावीत यासाठीच  'स्मार्ट अभ्यासिका' हा उपक्रम राबविला आहे.

-श्री.संजीव माधव बागुल (राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक) शाळा-कळमशेत, ता.मुळशी

add image
add image
  • Blog single photo
    2021-06-28 16:53:42

    Mrunali Sukhdev Khairnar

    खूप सुंदर काम करतायेत बागुल सर. त्यांच्या या कामामुळे आपणही असे काहीतरी करावे अशी ऊर्जा मिळते आणि आपल्या देशात बागुल सारं सारखे होतकरू शिक्षक लाभले याचा अभिमान आहे.

Leave Comments

Top