पौड : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून मुळशी तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या इमारत बाधकामासाठी प्रत्येकी २० लाख रूपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे यांनी दिली आहे.
राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानतंर्गत २०२०-२१ मधील मंजूर ग्रामपंचायत इमारत बांधकाम व नागरी सुविधा केंद्र खोली बांधकामासाठी मुळशी तालुक्यातील वांजळे, भोईणी, दारवली, मुगावडे, वळणे या ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला असून प्रत्येक ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी २० लाख रूपयांचा निधी उपलब्ध होणार आहे.या पाचही ग्रामपंचायतीच्या इमारती जीर्ण तसेच खराब झालेल्या होत्या. येथील सरपंच तसेच नागरिकांनी वारंवार ग्रामपंचायत कार्यालय बांधकामासाठी निधी मिळावा अशी मागणी केली होती.
काही दिवसांपूर्वी वांजळे, भोईणी, दारवली, मुगावडे, वळणे ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी निधी मिळावा अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे करण्यात आली होती. या विषयाला प्रशासकीय मान्यता मिळालेली पुढील काही दिवसांत इमारत बांधकाम सुरू होईल असे मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष महादेव कोंढरे यांनी सांगितले.