logo
add image
add image
Blog single photo

कळमशेतची आदिवासी वस्ती झाली अभ्यासाची वाडी


पौड: कोरोनामुळे ग्रामीण भागात शाळा बंद असून ऑनलाईन शिक्षणाचाही खेळखंडोबा झाला आहे. तथापि घरबसल्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनासाठी मुळशी तालुक्यातील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री.संजीव बागूल या शिक्षकाने कल्पकतेने अभ्यासाच्या धड्यांनी कळमशेतच्या (ता.मुळशी) आदिवासी वस्तीवरील घरांच्या भिंती रंगविल्या आहेत. अभ्यासाची वाडी होण्याचा तालुक्यात पहिला मान वस्तीला मिळाला असून या बांधवांच्या घरांच्या भिंती बोलक्या झाल्या आहेत. 

गतवर्षी तालुक्यातील शंभर टक्के टॅबयुक्त पहिली शाळा करणाऱ्या श्री.बागूल सर यांच्या अभ्यासाच्या वाडीचा नवा मुळशी पॅटर्न तयार केला आहे. कळमशेतच्या प्राथमिक शाळेत बहुतांश मुले आदिवासी समाजाची आहेत. गावाबाहेरच ही वस्ती वसली आहेत. दोन वर्षापूर्वी श्री.बागूल यांची या शाळेत बदली झाली. यापूर्वी मांदेडे, संभवे या शाळेत नवोपक्रम राबवून जिल्ह्यात आदर्श शाळा करणारे बागूल यांनी आव्हान म्हणून कळमशेतची निवड केली. या शाळेतही त्यांनी वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम राबविल्याने ओढ्याकडे फिरणारी मुले शाळेत बसू लागली. त्यांच्यात शिक्षणाची गोडी वाढली. अंगठेबहाद्दर पालकांचाही ओढा शाळेकडे वाढला.

 गतवर्षी कोरोनामुळे शाळा बंद होत्या. परंतू माझ्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी बागूल यांनी प्रयत्न करून इन्स्टिट्युट फॉर वुमन आंत्रप्रेनॉरियल या संस्थेच्या सहकार्याने सर्व विद्यार्थ्यांना टॅब मिळवून दिले. पाठ्यक्रमाच्या सॉफ्टवेअरसह शंभर टक्के टॅबयुक्त शाळा करण्याचा पहिला मान कळमशेतला मिळाला होता. यावर्षी त्यांनी संभाव्य शाळाबंदचा धोका ओळखून घरबसल्या विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा यासाठी आदिवासीवस्तीवरील घरांच्या भिंतीवर पाठ्यक्रमाचे धडे रंगवले. इंग्रजी, गणितांचे मुलभूत संबोध स्पष्ट करणारी, मुलांची जिज्ञासा वाढविणारे घटकांचे रंगकाम करून'अभ्यास आपल्या दारी' हा उपक्रम राबवला.त्यामुळे ही वस्ती अभ्यासाची वाडीच झाली असून तालुक्यातील पहीला मानही तिला मिळाला आहे.आदिवासींची चिमुरडे घराच्या भिंतीवरील धडे दररोज वाचत आहेत. एकमेकांशी त्याबाबत चर्चा करतात. अगदी इंग्रजीही वाचून बोलतात. त्यांच्या या उपक्रमाचे तालुक्यात कौतुक होत आहे.

सर्वसामान्या प्रमाणेच माझ्या आदिवासी मुलांनाही आधुनिक दर्जाचे शिक्षणमिळावे म्हणून मी गतवर्षी सर्वांना टॅब मिळवून दिले. कोरोनाचे सावट अजूनही आहे. शाळा सुरू होतील की नाही सांगता येत नाही.विद्यार्थ्यांना घरबसल्या शिक्षण मिळावे म्हणून त्यांच्या घरच्या भिंतीवर अभ्यासाचे वेगवेगळे घटक रंगविले आहेत. घरी असला तरी तो अभ्यासात गुंतून रहावा, स्पर्धेत टिकून रहावा हा यापाठीमागचा उद्देश आहे.

- संजीव बागूल ( मुख्याध्यापक, कळमशेत)

add image
add image

Leave Comments

Top