पिरंगूट : राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यानमुळे जगभरात नवलौकिक पावलेल्या हिंजवडी आयटीनगरीला स्वतंत्र कोविड लसीकरण केंद्र हवं आहे. यासाठी ग्रामपंचायत सदस्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. हिंजवडी ग्रामपंचायत सदस्य विक्रम साखरे यांनी या संदर्भात पुढाकार घेतला असून, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची नुकतीच भेट घेतली.
हिंजवडी ग्रामपंचायत परिसरात झपाट्याने होत असलेला विकास, गगनचुंबी रहिवाशी इमारती तसेच नामांकित आयटी कंपण्यांचं विखुरलेल मोठ जाळं, परिणामी कित्येक पटीत वाढलेली लोकसंख्या. त्यामुळे हिंजवडीसाठी स्वतंत्र कोविड लसीकरण केंद्र करण्याची नितांत गरज असल्याचे साखरे यांनी जिल्हाधिकारी यांना सांगितले. राज्यभरात अठरा वर्षापुढील नागरिकांना सरसकट कोविड लसीकरण सुरु केल्याने अनेक लसीकरण केंद्रावर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. सध्या १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थी नागरिकांसाठी मुळशी तालुक्यात फक्त माण आणि पिरंगुट याठिकाणी लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. मुळशीच्या पूर्व पट्ट्यात हिंजवडीसह आयटीनगरी परिसरात लोकसंख्या तुलनेने खूपच जास्त आहे. हिंजवडीकरांना सद्यस्थितीत कोविड लसीकरणासाठी माण आरोग्य केंद्र अथवा पिंपरी चिंचवड शहरात जावे लागत आहे. हिंजवडी ग्रामपंचायत साठी स्वतंत्र कोविड लसीकरण केंद्र सुरु झाल्यास स्थानिक ग्रामस्थांसह लाखो आयटीयन्सची मोठी सोय होणार आहे. ग्रामपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांचे कोविड लसीकरण विनाअडथळा, सुरक्षित आणि जलद होण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य आक्रमक झाले असून, हिंजवडीसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र तात्काळ सुरु करण्यात यावे अशी आग्रही मागणी ग्रामपंचायत सदस्य विक्रम साखरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे भेट घेऊन केली आहे.
Deepak madane
A