पौड : मुळशी तालुक्यातील बहुप्रतिक्षित पौड ते कोळवण रस्त्याच्या कामाचे भुमिपूजन आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते आज पार पडले. कोळवण आणि पौड याठिकाणी नारळ फोडून या कामाचा श्रीगणेशा करण्यात आला असून कोळवणकडून या कामाला उद्याच सुरूवात होणार असल्याची माहिती आमदार संग्राम थोपटे यांनी दिली आहे .
पौड ते काशिग या १६ किमी. लांबी असलेल्या या रस्त्याचे काम मोतीलाल धूत इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीला देण्यात आले असुन कामाची अंदाजपत्रकिय रक्कम ९.५० कोटी आहे. करमोळी ते काशिग या दरम्यानच्या नागरिक या रस्त्यामुळे अक्षरशः हैराण झाले होते.करमोळी, चाले, दखणे, नानेगाव, नांदगांव, साठेसाई आणि कोळवण येथे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. तर आख्ख्या रस्त्याची एक बाजू खरबडीत झाली होती. मोठ्या प्रमाणात दुध व्यवसायिक, विद्यार्थी व शेतीमाल नेण्यासाठी तसेच स्थानिक व्यवसायिकांना आपल्या मालाची ने-आण करण्यासाठी दररोज या रस्त्याने ये-जा करावी लागते.
या भागात ऐतिहासिक गिरीवन, तीर्थक्षेत्र भालगुडी नारायणदेव मंदिर, सत्यसाई मंदिर, चिण्मय विभुती, तिकोणा किल्ला, पवना धरण, स्थानिक देवराई यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात, रस्त्याच्या दुरावस्थेमुळे पर्यटकांनीही पाठ फिरविल्यामुळे एकुणच स्थानिक रोजगारावर त्याचा फार मोठा परिणाम झाला होता.तसेच मुळशीतून तळेगाव,कामशेत, लोणावळा या ठिकाणी जाण्यासाठी हा रस्ता जवळचा आहे. आता रस्त्याचे काम होणार असल्याने नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण असुन नागरिकांनी आमदारांचे आभार मानले.
यावेळी मुळशी तालुका काँग्रेस अध्यक्ष गंगाराम मातेरे, शिवसेना तालुका प्रमुख सचिन खैरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बबनराव धिडे, पोपटराव दुडे, काँग्रेस युवक अध्यक्ष सुहास भोते, दादाराम मांडेकर, युवा नेते मधुर दाभाडे, पौडचे सरपंच जगदीश लांडगे, पोलिस पाटील संजय पिगळे, कोळवणच्या सरपंच धनश्री नवनाथ पालकर,दत्ता धिडे, संदीप केदारी, संदीप हुलावळे, अमित जांभुळकर, राहूल जाधव, कुमार शेडगे, काशिनाथ शिंदे, माजी सरपंच प्रविण साठे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एक वर्षात काम पूर्ण
पौड ते कोळवण रस्त्याचे काम उद्याच सुरू होणार आहे. सुरूवातीला मोय्रा आणि साईडपड्या तसेच कच्चे काम होणार असून पावसाळ्यानंतर डाबरीकरण होणार आहे. तसेच चाले येथील मोठ्या पुलासाठी एक कोटी रूपयांचा निधी उपलब्ध असून अजून निधी यासाठी मिळविण्यात येणार असून हा पूलही चांगल्या दर्जाचा केला जाणार असल्याची माहिती आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.