पिरंगूट : मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी सभापती बाळासाहेब चांदेरे यांच्या प्रयत्नांतून मुळशीकरांसाठी सुस येथे ५१ बेडचे मोफत उपचारांकरिता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती आरोग्य कोविड सेंटर येत्या दोन दिवसांत सुरू करण्यात येणार आहे.
यावेळी बाळासाहेब चांदेरे म्हणाले की,मुळशी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांना स्थानिक परिसरात योग्य आणि तत्काळ उपचार भेटावेत म्हणून कोविड केअर सेंटरची गरज होती. सुस येथील आयरीश लाँन्स येथे ५१ बेडचे नियोजन केले असून त्यासाठी ६ डॉक्टर्स ३ दिवस-रात्र पाळीत काम करणार आहेत. तसेच स्थानिक परिसरातील डॉक्टर्स देखील २-२ तास वेळ देणार आहेत. सोबतच ६ नर्स व आवश्यक कर्मचारी वर्ग असणार आहे. सेंटर साठी लागणारी औषधे गटविकास अधिकारी संदीप जठार व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजित कारंजकर हे पंचायत समितीच्या माध्यमातून देणार आहेत. यावेळी सुस गावच्या सरपंच अपूर्वा निकाळजे, जामगावचे माजी सरपंच हनुमंत सुर्वे, माजी उपसरपंच गणेश साळुंके उपस्थित होते.
याठिकाणी आँक्सिजनयुक्त अशा दोन रूग्णवाहिका उपलब्ध असणार आहेत. तर रूग्णास गरज पडल्यास सिंबॉयसिस हॉस्पिटल, विप्रो हॉस्पिटल व सुस हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी १० असे एकूण ऑक्सिजन बेड तसेच एकूण २ व्हेंटिलेटर बेडची सोयही करण्यात येणार आहे. डॉ.जी.बी.रजपूत व डॉ.सुगंधा नारळकर हे या ठिकाणचा कार्यभार संभाळणार आहेत.रूग्णांनी कोविड केअर सेंटरसाठी गणेश साळुंके - ७०८३७८०५५०,नितीन शिंदे - ९९२३१८६००० या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.