पौड : मुळशी तालुक्यातील शांत आणि सयंमी नेतृत्व असलेले माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य सुभाषभाऊ अमराळे यांचे आज निधन झाले आहे. ते ६८ वर्षाचे होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या अत्यंत विश्वासातील तसेच वेळोवेळी काँग्रेस नंतर राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर पवार साहेबांचे सुभाषभाऊ शिलेदार राहिलेले आहे. सुभाषभाऊंचा अंबडवेट,कासारआंबोली तसेच पौड या गावावर मोठा पगडा होता. पौड परिसरामध्ये सुभाषभाऊंचा मोठा चाहता वर्ग होता. पौड, चाले, मुगावडे येथील दूध संकलन केंद्रावर भाऊ दररोज जातीने हजर राहुन सर्वाशी हसतमुख चेहऱ्याने गप्पा मारायचे.
गेली अनेक वर्ष सुभाषभाऊनी दूध संकलन डेअरीच्या माध्यमातून पौड, कोळवण खोरे आणि मुळशी खोरे परिसरात आपल्या स्वभावाने अनेक जणांना आपलेसे केले होते. सन २००७ साली झालेल्या जिल्हा परिषद निवडणूकीत सुभाषभाऊचा पौड - आंबवणे जिल्हा परिषद गटातुन ३००० हजार पेक्षा जास्त मतांनी दणदणीत विजय झाला होता. सुभाषभाऊंनी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा उपाध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तसेच अबंडवेट ग्रामपंचायतचे साडेसात वर्ष सरपंच म्हणून कामकाज पाहिले आहे.सुभाषभाऊच्या आकस्मिक जाण्याने मुळशी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, दूध डेअरीवर दूध घालणारा गवळी परिवार, सर्व पक्षिय मिञ परिवार तसेच अमराळे परिवारावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे.