पौड : पौड येथील ग्रामीण रूग्णालयात ३० तर बावधन येथे ४० असे मिळून ७० आँक्सिजन बेड मुळशी तालुक्यातील कोरोना रूग्णासाठी जलद गतीने तयार करण्यात येणार असल्याची माहिती आमदार संग्राम थोपटे व मावळ - मुळशीचे प्रांतधिकारी संदेश शिर्के यांनी दिली आहे.
मुळशी तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा आमदार संग्राम थोपटे यांनी आज पौड येथील तहसिलदार कार्यालयामध्ये घेतला. यावेळी मावळ मुळशीचे प्रांतधिकारी संदेश शिर्के, तहसिलदार अभय चव्हाण, पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, गटविकास अधिकारी संदीप जठार, तालुका आरोग्य अधिकारी अजित कारंजकर, काँग्रेस तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे, युवक अध्यक्ष सुहास भोते, दादाराम मांडेकर, युवा नेते मधुर दाभाडे, सरपंच समिर सातपुते, माजी सरपंच निलेश दगडे उपस्थित होते.
आमदार संग्राम थोपटे यावेळी म्हणाले की, पौड ग्रामीण रूग्णालयात ३० तर बावधन येथे ४० आँक्सिजन बेडचे कोरोना रूग्णासाठी तयार करण्यात येणार आहे. या दोन्ही ठिकाणी मेडिकल आँफिसर व नर्सची सोय केली जाईल.
मावळ - मुळशीचे प्रांतधिकारी संदेश शिर्के म्हणाले की, १०० आँक्सिजन बेडची जागा एकाच ठिकाणी उपलब्ध होत नसल्याने पौड ३० आणि बावधन ४० असे मिळून ७० बेडचे कोरोना रूग्णासाठी तयार करण्यात येणार आहे. या ठिकाणी आठवड्यातून सहा तास खाजगी डाँक्टर सेवा देतील.
तहसिलदार अभय चव्हाण म्हणाले की, पौड ग्रामीण रूग्णालयात होणाऱ्या प्रसुती या माण व माले येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात करण्यात येतील. तसेच पौड येथे होणारे शवविच्छेदन व दररोजचे रूग्ण तपासणी यापुढेही तशीच सुरू राहिल.
मुळशीतील कोरोना रूग्ण वेल्ह्यात दाखल
मुळशी तालुक्यातील एका कोरोनाला काल ( दि.१८) रोजी तात्काळ आँक्सिजन बेडची आवश्यकता होती. दिवसभर प्रयत्न करूनही या रूग्णाला कोठेही आँक्सिजन बेड मिळाला नाही. पञकार रमेश ससार यांनी काँग्रेस तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे यांच्याशी संपर्क साधला. यानंतर आमदार संग्राम थोपटे यांनी या रूग्णाला राञी दिड वाजता वेल्हे आरोग्य केंद्रात आँक्सिजन बेड मिळवून दिला.