पुणे : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत (एनसीएल) पीएच.डी करणाऱ्या तरुणाचा डेटींग ऍपवरून ओळख झालेल्या व्यक्तीने समलिंगी संबंधातून खून केल्याचे उघड झाले. विशेषतः खून करणाऱ्या आरोपीने स्वतःही गळा कापून आणि झोपेच्या गोळ्या घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ' पीएचडी ' करणारा तरुण आपल्याला सोडून जाईल, या भितीने हा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
रविराज राजकुमार क्षीरसागर (वय 24 , रा.औंढा , हिंगोली , सध्या वारजे ) असे संशयित आरोपीचे नाव आहे. तर सुदर्शन उर्फ बाल्या बाबुराव पंडीत ( वय 30 , सध्या रा . शिवनगर , सुतारवाडी , पाषाण , मूळ रा . जानेफळ , जाफराबाद , जालना) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सुदर्शन पंडीत हा राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत पीएचडीसाठी आला होता. सुतारवाडी भागात तो पेईंग गेस्ट म्हणून राहत होता .
' शीमेल ' या डेटिंग साईटच्या माध्यमातून रविराज आणि सुदर्शन या दोघांची सात ते आठ महिन्यापूर्वी ओळख झाली होती. रविराज हा इंटेरिअर डिझायनर असून विवाहित आहे. त्याच्या पत्नीने घटस्फोटासाठी दावा केला आहे. तर सुदर्शनचा नुकताच विवाह ठरला होता. सुदर्शनचा विवाह ठरल्याने तो आपल्याला सोडून जाईल, अशी भीती रविराजला वाटत होती. त्यामुळे त्यांच्यात वाद सुरू होते . दरम्यान आरोपी रविराजने सुदर्शनला शुक्रवारी रात्री पाषाण सुसखिंड येथे बोलावून घेतले. त्यानंतर तेथेही त्यांच्यात जोरदार भांडणे झाली, त्यानंतर रविराजने त्याच्याकडील धारदार शस्त्राने सुदर्शनचा गळा चिरला. त्याची ओळख पडू नये, यासाठी त्याच्या तोंडावर दगड मारला. चतुश्रृंगी पोलिसांना खबर मिळाली, पोलिस घटनास्थळी पोचल्यानंतर त्यांना सुदर्शनचा मृतदेह नग्नावस्थेत सापडला. पोलिस उपायुक्त पंकज देशमुख , सहायक पोलिस आयुक्त रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे, पोलीस निरीक्षक दादा गायकवाड , उपनिरीक्षक मोहनदास जाधव, पोलिस उपनिरीक्षक महेश भोसले यांच्या पथकाने ही कारवाई केली.
... आणि पाकीटाने दिला तपासाला दिशा! सुदर्शनचा मृतदेह नग्नावस्थेत आढळल्याने त्याची ओळख पटविणे अवघड होते. मात्र तेथेच त्यांना त्याचे पाकीट सापडले. त्यामध्ये सुदर्शनचे ओळखपत्र होते. सुदर्शनची ओळख पटल्याने तपासाला गती मिळाली. त्याच्यासमवेत राहणाऱ्या तरुणांकडे चौकशी केली. तेव्हा महिलांप्रमाणे आवाज असणारा एक तरुण त्याला भेटायला आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच तांत्रिक तपासावरुन तो सातत्याने रविराजच्या संपर्कात असल्याचे पोलिसांना कळाले. त्यानंतर पोलिसांनी रविराजचे घर गाठले , मात्र रविराजने स्वतःचा गळा कापून आणि झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे तसेच त्यास उपचारासाठी रुग्णालयात नेल्याची माहिती पोलिसांना त्याच्या आई वडिलांकडून मिळाली. त्यानंतर पोलिसांनी रविराजची रुग्णालयात जाऊन चौकशी केली, तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच रविराजने पोलिसांना चकवा देण्यासाठी पत्नीशी पटत नसल्याने आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली होती .