पौड : ढगफुटी सदृश पावसामुळे पौड,बावधन परिसरामध्ये हाहाकार झाला. या ढगफुटी सदृश पावसामुळे येथील माजी उपसरपंच दिलीप उत्तमराव दगडे यांच्या घरात तसेच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसले होते. पाण्याचा प्रवाह इतका जास्त होता की यामुळे परिसरात बंद करून उभ्या असलेल्या चार चाकी कार ३० ते ४० फूट लांब वाहून गेल्या. घरात पाणी घुसल्याने त्यांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले.
बावधनमध्ये डोंगरावरचे पावसाचे पाणी केतकीच्या ओढ्याने रामनदीत मिळते. येथे सोसायटीचे बांधकाम करणारे बांधकाम व्यावसायिकांनी केतकीचा ओढा बुजवून त्याऐवजी पाण्याचा प्रवाह वाहून जाण्यासाठी छोटीशी पाईपलाईन टाकली. तथापि बिल्डरने ओढाच बुजविल्याने दरवर्षी पावसाच्या पाण्याने नागरिकांचे आतोनात नुकसान होते.
रविवारी दिलीप दगडे यांच्या घरात त्यांच्या आईच्या वाढदिवसाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी नातेवाईक, मित्र असे जवळपास सव्वाशे ते दिडशे लोक जमले होते. त्यांच्या सुमारे तीस चारचाकी गाड्या घरासमोरील रस्त्यावर उभ्या होत्या. तर घरासमोरील बगीच्यात जेवणाची व्यवस्था केली होती. दुपारच्या मुसळधार पावसामुळे डोंगरावरून वाहत आलेल्या पाण्याने दिलीप दगडे यांच्या घराची सरंक्षक भिंत तोडली. त्यामुळे पाण्याचा मोठा प्रवाह त्यांच्या घराच्या दिशेने घुसला. त्यामुळे लोकांची पळापळ झाली. सगळेजण घरात घुसले. परंतू पाण्याच्या लोंढ्याने दगडे यांच्या चार दुचाक्या वाहून गेल्या.
त्यांच्या आणि पाहूणेमंडळींच्या सुमारे पंचवीस चारचाकी गाड्या निम्म्या पाण्याखाली गेल्या. जेवणासाठी मांडलेल्या खुर्च्या, टेबल, आचाऱ्याची भांडी सर्व रामनदीत वाहून गेले.घरातील फर्निचर, धान्य, कपडे यांचे नुकसान झाले. यात दगडे यांची सुमारे अडीच कोटी रूपयांचे नुकसान झाले. केवळ ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बुजविल्याने दगडे यांच्या घरात गेली तीन वर्षांपासून पावसाचे पाणी घुसते.रस्त्यावर पाणी आल्याने हा रस्ता पोलिसांनी वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता.रामनदीलाही मोठ्या प्रमाणात पाणी आले होते.
तर भुगाव, पौड, धनवेवाडी, येथे डोंगरावरून वाहून आलेल्या पाण्यात दगड व माती वाहून आल्याने रस्त्यावर वाहने चालविणे कठिण होत होते.तर अबंडवेट येथे बाळू धनवे याची डोंगारात चरत असलेल्या १८ जनावरापैकी एक खिलारी जातीचा बैल वीज पडून मृत्यूमुखी पडला.