पौड : भोसरी पोलिस स्टेशन हद्दीतून बेपत्ता असलेल्या फूलविक्रेता तरूणाचा मृतदेह घोटावडे (ता. मुळशी) येथील घोटावडे व माण या दोन गावच्या सीमेवर असलेल्या बापूजीबुवा खिंडीत कुजलेल्या अवस्थेत पौड पोलिसांना मिळून आला आहे. याबाबत पोलिस पाटील अर्चना गोडांबे यांनी पोलिसांत माहिती दिली.
मयत प्रशांत आनंदा डोळस (वय ३०, रा. भोसरी) असे मृताचे नाव आहे. तो शनिवारपासून (ता. २०) बेपत्ता झाला होता.याप्रकरणी अस्मिता प्रशांत डोळस ( वय २८ वर्षे, रा डोळस वस्ती बुद्ध विहाराचे मार्गे पी एम टी चौक अशोकनगर भोसरी ) यांनी भोसरी पोलिस स्टेशनला खबर दिली होती.शुक्रवारी (ता. २६) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास येथील खिंडीत त्याचा मृतदेह आढळला. घोटावडे गावाकडून हिंजवडीकडे जाताना बापूजीबुवा खिंडीत गर्द झाडी लागते. यामध्ये गावातील गुराख्यांना हा मृतदेह दिसला होता.
२० आँगस्ट रोजी जेवणाचे पार्सल घेवून येतो असे सांगून राहते घरातून तो निघून गेला होता.मृतदेह असलेल्या ठिकाणी मोठी दुर्गंधी सुटली होती. या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमोद बलकवडे, पोलिस पाटील दिपक मातेरे यांनी कुजलेला मृतदेह हलविण्यासाठी मदत केली.
पौड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गायकवाड,विनायक देवकर,पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, पोलीस हवालदार संदीप सपकाळ, नितीन रावते,रॉकी देवकाते,पोलीस नाईक प्रशांत बुनगे,कामटे, पोलीस कॉन्स्टेबल साहिल शेख हे पुढील तपास करीत आहे.