पुणे : पानशेत येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारातील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.सदर घटनेचा तपास पोलिस अधिक्षक डाँ.अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करत आरोपीला ४८ तासांत अटक करून या घटनेशी संबंधित सर्व पुरावे गोळा करून न्यायालयात सादर केल्यानंतर या आरोपीला एका वर्षात फाशीची शिक्षा न्यायालयाने सुनावली. एक वर्षातच या घटनेचा पाठपुरावा करून आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देण्यास कर्तव्य तत्पर राहिलेले पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक डाँ. अभिनव देशमुख यांचा पुणे जिल्हा शिवसेना महिला आघाडी तर्फे बारामती लोकसभा शिवसेना सहसंपर्क संघटीका स्वाती ढमाले यांनी सत्कार केला आहे.
वेल्हे तालुक्यात १५ फेब्रुवारी २०२१ रोजी कातकरी समाजातील २ वर्ष ५ महिन्यांची मुलगी हरवल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. तिचे अपहरण झाल्याचा संशय तसेच घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधिक्षक डाँ.अभिनव देशमुख यांनी घटनास्थळाला भेट दिली होती. वेल्हे पोलिस आणि गुन्हे अन्वेषण विभागाची ८ पथके तयार करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी हवेली तालुक्यातील मालखेड ते थोपटेवाडीकडे जाणाऱ्या रोडवरील पुलाच्या मोरीच्या सिमेंट नळीमध्ये मुलीचा मृतदेह मिळून आला होता.यामध्ये तिचा गळा दाबून खून झाला असल्याचे निष्पन्न झाले होते. वेल्हे पोलिस ठाणे तसेच गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अथक परिश्रम करुन संजय बबन काटकर ( वय.३८, रा.कांदवे,पानशेत, ता.वेल्हे ) या आरोपीला ४८ तासाच्या आत अटक केली होती. आरोपीला न्यायालयात हजर करून दोषारोपपञ दाखल करण्यात आले होते. पोलिस अधिक्षक डाँ.अभिनव देशमुख यांनी हा खटला जलतगती न्यायालयात सुनावणीसाठी घ्यावा अशी विनंती केली होती. या नराधमास प्रमुख जिल्हा व सञ न्यायाधीश संजय देशमुख यांनी मरेपर्यंत फाशीचा हा निकाल एका वर्षात देऊन न्याय दिला आहे.
तसेच सदरील घटनेचा पाठपुरावा विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोह्रे यांनी सुध्दा सतत केला आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डाँ. अभिनव देशमुख यांनी योग्य तपास व सादर केलेले साक्षी पुरावे न्यायालयात सिद्ध झाल्याबद्दल व त्या घटनेतील आरोपीला शिक्षा होण्यासाठी आणि मुलीला न्याय देण्यासाठी काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी या सर्वांचे पुणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीतर्फे अभिनंदन करण्यात आले. यावेळी पौड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, वेल्हे तालुका संघटीका जयश्री सुनील शेंडकर,मुळशी तालुका संघटीका सुरेखा तोंडे , वेल्हे युवासेना तालुका प्रमुख सुनिल शेंडकर,मुळशी तालुका समन्वय दिपक आबा करंजावणे,मंदा शंकर शिळीमकर उपस्थित होते.
तपास पथकाला ३५ हजाराचे बक्षीस
पोलिस अधिक्षक डाँ.अभिनव देशमुख, तत्कालीन अपर पोलिस अधिक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे पाटील,पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी कामकाज पाहिले. या कामगिरीबद्दल पोलिस अधिक्षक डाँ.अभिनव देशमुख यांनी मनोज पवार व त्यांच्या पथकाला ३५ हजार रूपयांचे बक्षीस जाहिर केले.