पौड : मुळशी धरण पाणलोट क्षेत्रात काल राञी ढगफूटी सदृश्य पाऊस झाला असून ताम्हीणी परिसरात २४ तासात ४६८ मीमी पावसाची नोंद झाली आहे. धरणामध्ये गेल्या २४ तासांत ऐतिहासिक अशा ७३ दलघमी (म्हणजेच २.६० अघफू/टिएमसी) आवक नोंद झाली आहे. धरण जलाशय पातळीत ७ फूटाने वाढ झाली असल्याची माहिती टाटा धरण प्रमुख बसवराज मुन्नोळी यांनी दिली आहे.
मुळशी तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे मुळशी धरणातून पाणी न सोडताही यावेळी मुळा नदीला पूर आलेला असून तालुक्यातील जवळजवळ सगळेच रस्ते पाण्याखाली गेले होते. तर पौड, कोळवण, मांदेडे, बेलावडे,भादस,रिहे,मुठा याभागातही ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने ओढ्याना मोठा पूर आला होता.
पौड येथे डोंगरातून वाहून आलेल्या पाण्यामुळे पौड पंचायत समिती समोरील रस्ता पाण्याखाली गेला होता तर पौड ग्रामपंचायत समोरून मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. दारवली - अंबडवेट दरम्यान असलेल्या पूलावरूनही मोठ्या प्रमाणत पाणी वाहत होते. सुतारवाडी घाट,पिरंगूट घाटात रस्त्यावर मोठमोठी दगडी वाहून आलेली होती.