पौड : उरवडे ( ता.मुळशी ) येथील एस.व्ही.एस ॲक्वा टेक्नाँलाँजी कंपनीला लागलेल्या आगीत सतरा मृतदेहाचा अक्षरशः कोळसा झाला असून सर्व मृतदेह ससून रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आलेले असून या मृतदेहाची डीएनए चाचणी आज करण्यात येणार आहे.
कामगार ज्या खोलीत पँकिगचे काम करायचे त्या खोल्या बंदिस्त होत्या. येथील दरवाजा हा सरकता असल्याने आग लागल्यानंतर दरवाजा उघडायला अडचण निर्माण झाली.आग लागल्यानंतर कर्मचाऱ्यांना बाहेर पडायला संधीच मिळाली नाही.यामुळे सर्व मृतदेह आगीत भस्मसात झाले. शोध कार्यात सापडलेले मृतदेह अक्षरशः पोत्यात भरून रूग्णवाहिकेत टाकले जात होते. रूग्णवाहिकेत नक्की काय टाकले जात आहे हे कोणालाही समजत नव्हते. सर्व मृतदेह ससून रूग्णालयात नेल्यानंतर मृताच्या नातेवाईकांनी ससून रूग्णालयात राञी गर्दी केली. माञ मृतदेहाची ओळख पटत नसल्याने येथील वातावरण शोकाकूल बनले होते.
आज मृतदेह ताब्यात मिळणार
कंपनीत लागलेल्या आगीत मृतदेहाचा अक्षरशः कोळसा झाला असून मृतदेहाची डीएनए टेस्ट करावी लागणार आहे.यासाठी आज मृताचे आई वडील किंवा मुलगा यांची चाचणी करून डीएनए चाचणी करण्यात येणार असून मृतदेह आज नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाणार आहेत.