पिरंगूट : मुळशी तालुक्यातील महसूल विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आज पहिल्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यामध्ये नायब तहसीलदार, अव्वल कारकून, तलाठी, लिपिक, कोतवाल यांचा समावेश आहे. कोरोना काळामध्ये या सर्वांनी अतिशय प्रामाणिकपणे काम केल्यामुळे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे असे तहसीलदार अभय चव्हाण यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात ४० जणांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये पिरंगुट मंडल अधिकारी सुहास कांबळे यांना पहिला डोस देण्यात आला.उर्वरित दुसऱ्या टप्प्यामध्ये 70 कर्मचारी आणि अधिकारी यांना देण्यात येणार आहे. संभ्रमात असलेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे समुपदेशन सुरू असून लवकरच त्यांनाही हे डोस देण्यात येणार आहेत. कोविशिल्ड या लसीचा पहिला डोस सर्वांना देण्यात आल्याची माहिती तहसीलदार अभय चव्हाण यांनी दिली. यावेळी नायब तहसीलदार भगवान पाटील, महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.