मुळशी : घरातून रागात निघून गेलेली मुलगी एका तासात कुटूंबियांकडे स्वाधीन झाली. स्थानिक महिला आणि पौडपोलिसांनी तात्काळ तपास करत मुलीला कुटुंबाकडे सुपूर्द केले.
याबाबत माहिती अशी की, आज दुपारच्या सुमारास पिरंगुट परिसरात शेतामध्ये झाडा खाली एक मुलगी एकटीच बसलेली दिसली. येथून जाणाऱ्या मंदा किर्तेवाड या महिलेनी ही मुलगी पाहिली. किर्तेवाड यांनी जवळ जाऊन त्या मुलीची विचारपूस केली. तसेच नाव पत्ता विचारला. परंतू तिने माहिती सांगितले नाही. मुलगी काही बोलत नसल्याने त्यांनी सदर मुलीस पिरंगुट पोलिस चौकीत घेऊन आल्या. त्याठिकाणी मुलीला विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली असता तिने नाव सांगून उरवडे येथे राहत असल्याचे सांगितले.
दरम्यान पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस हवालदार अनिता रवळेकर यांनी तिच्या आई वडीलांचा शोध घेवुन मुलीला आईच्या ताब्यात दिले.
सामाजिक बांधिलकी जपत मंदा किर्तेवाड यांनी तात्काळ मुलीला पोलिस स्टेशनला आणले. याबद्दल त्यांचा पौड पोलिसांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक विनायक देवकर, महिला पोलिस अनिता रवळेकर व आदी उपस्थित होते.