मुळशी : कोंढावळे ( ता.मुळशी ) येथे एका व्यक्तीला जीवघेण्या हल्ल्यातून वाचविण्यात आले होते. या गंभीर घटनेवेळी धाडसी निर्णय घेत पोलिस पाटील राणी समीर कंधारे यांनी या जखमी इसमाला मदत करत त्याचा जीव वाचवला होता. अशी धाडसी निर्णय क्षमता दाखवत हल्ल्यात जखमी झालेल्याचे प्राण वाचविलेल्या पोलिस पाटील राणी समीर कंधारे यांचे कौतुक करत पौड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
कोंढावळे गावात काही जणांनी एका व्यक्तीवर हल्ला केला होता. यात तो जखमी झाला होता. जखमी हा पोलिस पाटील राणी समीर कंधारे यांच्या घराजवळ गेला असता त्याला पोलिस पाटील व त्याच्या घरातल्या व्यक्तीनी सहारा देत घरामध्ये दडवून ठेवले. त्यांनी तात्काळ संबंधित घटनेची माहिती पौड पोलिसांना दिली. पौड पोलिसांनीही घटनास्थळावर धाव घेत जखमीला रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले व तात्काळ हल्लेखोरांना अटकही केली.
पोलिस पाटील राणी कंधारे यांनी दाखविलेल्या कार्यकत्परतेमुळे एका निष्पाप व्यक्तीचे प्राण वाचले असून अशीच कार्यतत्परता गावात काम करताना सर्व पोलिस पाटीलांनी दाखविणे गरजेचे आहे. असे मत वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी व्यक्त केले.
या सत्कारावेळी वेळी पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, कोंढावळेचे सरपंच अनंता कंधारे, बिट अंमलदार संदीप सपकाळ, समीर कंधारे, दिपक चव्हाण, संतोष निकाळजे उपस्थित होते.