logo
add image
add image
Blog single photo

आले रे आले.....गणपती बाप्पा आले


मुळशी :  ढोलताशांचा गजर, टाळ्यांचा नाद आणि मोरया..... मोरयाच्या गजरात बुधवारी ( दि.३१ आँगस्ट ) रोजी उत्साही वातावरणात श्री गणेशाचे आगमन झाले असून तालुक्यात बाप्पाच्या आगमनासाठी मोठा उत्साह असल्याचे दिसून आले. सर्वत्र ढोल ताशांसह बाप्पाचं आगमन झाले. त्यामुळे संपुर्ण मुळशी तालुक्यात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

         मागील दोन वर्ष कोरोना काळ असल्याने गणपती बाप्पाचे आगमन झाले, मात्र फारसा उत्साह नव्हता. यंदा मात्र कोरोनाचे मळभ दूर झाल्याने भाविकांनी जोरदार उत्साहात धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. दरम्यान आठवडाभरापासूनच गणेश मूर्ती सजावट व पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी भाविकांची गर्दी होत होती तर कालपासूनच तालुक्यातील महत्त्वाच्या बाजारपेठ फुलून गेल्या होत्या. दरम्यान काल सकाळपासूनच गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष करीत ढोल ताशांच्या गजरात भाविकांनी गणेश मूर्तीची खरेदी करत गणेशाचे घरोघरी तसेच मंडळांचे आगमन झाले.

          दरम्यान घरोघरी आपापल्या पसंतीनुसार विविध आकाराच्या बाप्पांना वाजत गाजत आणले असून दुर्वा, फुले, धूप, दीप, पंचारती अशी साग्रसंगीत तयारी पूजेसाठी करण्यात आली. पूजा साहित्य खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांमुळे बाजारपेठा फुलून गेल्या होत्या. तर खरेदीसाठी पौड, पिरंगुट तसेच तालुक्यातील इतर बाजारपेठांमध्ये गर्दी झालेली पाहायला मिळाली. घरोघरीच्या बाप्पांच्या स्वागताबरोबरच ऑफिसेस, दुकाने आदी ठिकाणीही गणपतीची स्थापना करून प्रत्येकजण आपापल्या परीने बाप्पांचे जोरदार स्वागत करीत आहे.

           ढोलताशे, बँडपथक, ध्वजपथक, सनई चौघड्याच्या निनादात रथामध्ये किंवा पालखीमध्ये बसवून गणरायाची मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी नेण्यात येत आहेत.शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजाअर्चा करून गणरायाची घरोघरी स्थापना करण्यात आली. 

add image
add image

Leave Comments

Top