पिरंगूट : सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या भरे येथील आबासाहेब शेळके मित्र मंडळाने सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुळशी तालुक्यात कोरोना व ओमायक्रोन विषयक जागृती अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत फ्लेक्स व भित्ती पत्रकाद्वारे कोरोना व ओमायक्रोन याबद्दल माहिती देण्यात येत आहे. या पत्रकातून आजाराची लक्षणे, घ्यावयाची काळजी तसेच लक्षणे आढळल्यास कोणत्या शासकीय रुग्णालयात उपचार मिळतील याबाबत माहिती दिली जात आहे. विशेष म्हणजे मंडळाचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन शाळा, महाविद्यालये, सोसायट्या व सार्वजनिक ठिकाणी भित्ती पत्रके लावून तसेच नागरिकांना भेटून या आजाराबाबत जागृती करताना दिसत आहेत.
याबाबत अभियाना बाबत माहिती देताना मंडळाचे संस्थापक माधवराव उर्फ आबासाहेब शेळके म्हणाले की, कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत आपण बरेच काही गमावले असून कोरोनाच्या महाभयंकर संकटाने पुन्हा तोंड वर काढले आहे. मागील अनुभव लक्षात घेता आपण या संकटाला वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. त्याकरिता याबाबत जागृती व्हावी याकरिता आम्ही प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली कोरोना जागृती अभियान सुरू केले आहे.
ज्या नागरिकांचे लसीकरण राहिले आहे अशा नागरिकांनी लवकर लसीकरण करून घ्यावे तसेच नागरिकांना या आजाराबाबत काही अडचणी आल्यास तालुक्याचे आरोग्य अधिकारी अजित कारंजकर व जवळच्या शासकीय रुग्णालयाशी संपर्क करण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.